(SBI) मधील एक क्षण ( बुजुर्ग )
बुजुर्ग
काल स्टेट बँकेत गेलो होतो, गेल्यागेल्या तिथल्या गार्डने मला झाडलं, म्हणाला की इथं थांबायचं नाही ते फॉर्म घ्यायचा अन लायनीत उभं राहायचं. च्यायला म्हटलो आपली काही इज्जत बिज्जत आहे की नाही?? शिस्तीत बोलायचं सोडून डायरेक्ट जोरजोरात बोलतोय हा. लगेच शंकऱ्याला फोन केला जो महाराष्ट्र बँकेत कॅशियर आहे, त्याला बोललो साल्यांनो सरकार बँकेचं प्रायव्हेटायजेशन करतंय ते एकदम व्यवस्थित करतंय. माजलात साल्यांनो तुम्ही लोकं. SBI

साडेदहाच्या सुमारास फोन केल्यामुळं त्याने काही प्रतिउत्तर दिलं नाही, गडबडीत आहे नंतर फोन करतो म्हणून फोन ठेऊन दिला. मी इकडं फॉर्म भरलो, कितीच्या किती नोटा त्या व्यवस्थित लिहून, त्यांची बेरीज करून लायनीत थांबलो, माझ्याकडचा पेन बघून काही म्हातारी आज्जी आजोबांनी फॉर्म भरून घेतला, इथं एखादं टेबल टाकून अशा लोकांना मदत करायचा विचार मनात येऊन गेला, मी लगेच त्याला कंट्रोल करून इकडं तिकडं बघू लागलो त्या गार्डला खुन्नस देऊ लागलो. विनाकारण तो लोकांना रागावून बोलत असतानाचा बघून त्याच्याबद्दलचा राग वाढू लागला होता. त्याची ती बेंबीच्या वरची पॅन्ट बघून हसू येऊ लागलं. नेमकं एवढी पॅन्ट वर घ्यायची गरजच काय असं वाटू लागलं? एकदोन ओळखीच्या लोकांना त्याने आत पाठवलं, मी त्यावर काही बोलणार तितक्यात एकाने त्या जाणाऱ्या माणसाला हटकुन लायनीत थांबायला सांगितलं. SBI
माझा नंबर लांबवर होता, मागच्या तीनेक वर्षांत पहिल्यांदा गेलो असेन
तेवढ्यात एक म्हातारे मामा सावरत सावरत बँकेच्या आवारात आले, सोबत दारू पिलेला मुलगा होता, ओळखीचाच होता तो पण. त्याने पैसे काढायचा फॉर्म घेतला अन अण्णा चला तिकडं भरू सगळं असा बोलला. अण्णा जोरात ओरडले,”नालायका, मला येतयं बे फॉर्म भरायला अन पेन कोणाला देतोयस?? आहे माझ्याकडे. असं म्हटल्या म्हटल्या या वादात गार्डने उडी घेतली, त्याने त्यांच्या पोराला गेट बाहेर जायला सांगितलं आणि खरं सांगू इथंच त्या गार्डबद्दलचा राग निघून गेला. अण्णा कोपऱ्यात बसले, लांबूनच मला तारीख आजची तीनच आहे का असा विचारले, त्यांना ऐकू कमी येत असेल म्हणून मी इशाऱ्यात हो म्हणून सांगितलो. महिना जस्ट चेंज झाल्यामुळं एप्रिल अन मे मध्ये ते थोडंस कन्फ्यूज होऊन आणखी एकदा मला महिना विचारले मी इशाऱ्यात हायफाईव्ह केलो.
न पिणारा दुसरा मुलगा माझ्या मित्राचा बाप होता, त्या मित्राच्या भूशारी गोष्टी मी आठवू लागलो, त्याच्याकडे असलेला आयफोन बघून वेगळंच वाटू लागलं. साठ हजारांचा फोन वापरणारा मुलगा अन दोन हजारांसाठी वडिलांसोबत अन भावासोबत भांडण करणारा बाप बघून हसू येऊ लागलं.
रडणाऱ्या अन असाहाय्य त्या अण्णांकडे बघून दुःख होऊ लागलं.
बँकेच्या शेजारीच असणाऱ्या ढासाळणाऱ्या,गवताने भरलेल्या, जागोजागी भल्यामोठ्या चिरा पडलेल्या बुरुजाकडे बघून त्याचे जवानीतले दिवसं इमाजिन करू लागलो. त्याचा तो असणारा थाट, असणाऱ्या तोफा, होणारे उत्सव, मिळणारा मान अन सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात वाढणाऱ्या अन स्वतःला राजे समजणाऱ्या त्या लोकांना आठवू लागलो.